top of page

BG 18.78

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८ ॥

यत्र-जेथे; योग-ईश्वरः-योगेश्वरः कृष्णः-भगवान श्रीकृष्ण; यत्र-जेथे; पार्थः--पृथापुत्र; धनुः-धरः-धनुर्धर; तत्र-तेथे; श्रीः-ऐश्वर्य; विजयः-विजय; भूतिः-असामान्य सामथ्र्य, ध्रुवा-निश्चितच; नीतिः-नीती; मतिः मम-माझे मत.

जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामथ्र्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.

तात्पर्य: भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विचारणेद्वारे झाला. भीष्म, द्रोण आणि कर्ण आदी महान योद्धयांच्या साहाय्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजयी होतील, अशी त्याला आशा होती. आपल्या पक्षाचा विजय होणार अशी त्याला आशा होती; परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय राजाला म्हणाला की, 'तुम्ही विजयाची आशा करीत आहात; परंतु माझे मत आहे की, ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तेथे सर्व सद्भाग्य असते.'त्याने निश्चितपणे स्पष्ट केले की, धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू शकत नाही. अर्जुनाच्या पक्षाचा विजय हा निश्चित होता, कारण श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित होते. श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणे हे ऐश्वर्याचेच एक प्रतीक आहे. श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि वैराग्य हे त्यापैकीच एक आहे. अशा वैराग्याची अनेक उदाहरणे आहेत, कारण श्रीकृष्ण वैराग्याचेही स्वामी आहेत.

वास्तविकपणे युद्ध हे दुर्योधन आणि युधि-ि ठर यांच्यामध्ये होते. अर्जुन हा आपला थोरला बंधू युधिष्ठिर याच्या वतीने युद्ध करीत होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होता. जगावर कोण राज्य करणार याचा युद्धामुळे निर्णय होणार होता. जगाची सत्ता ही युधिष्ठिरांकडे जाईल अशी संजयाने भविष्यवाणी केली. या ठिकाणी असेही म्हटले आहे की, युधिष्ठिरांनी युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर राज्याची अधिकाधिक भरभराट होईल, कारण तो पुण्यवान आणि धर्मनिष्ठच होता असे नव्हे तर तो दृढ सदाचारीही होता. त्याने आपल्या आयुष्यात कधीही असत्य भाषण केले नाही.

          अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटते की, भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे. तथापि, असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही. काहीजण विरोध दर्शवतील की, अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनीच उद्युत केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते, परंतु वस्तुस्थिती ही आहे की, भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता ही नवव्या अध्यायातील चौतिसाव्या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे की, मन्मना भव मद्भत:-मनुष्याने कृष्णभक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना शरण जाणे हेच सर्व धर्माचे सार आहे. (सर्वाधिमन्पिरित्यज्य मामेर्क कारण व्रण) भगवद्गीतेतील उपदेश म्हणजेच सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील. गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश होय व तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय. अठराव्या अध्यायाचा हाच निर्णय आहे.

          भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की, आत्मसाक्षात्काराकरिता ज्ञान आणि ध्यान हेही मार्ग आहेत; परंतु श्रीकृष्णांना शरण जाणे ही परमोच्च संसिद्धी आहे. भगवद्गीतेचे हेच सार आहे. विविध कर्मविधींना आणि वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून असणारा नियामक तत्वाचा मार्ग हा ज्ञानाचा गुह्य मार्ग असू शकेल. परंतु जरी गृहस्थ आहेत, तरी धार्मिक कर्मकांडे, ध्यान आणि ज्ञानाचे अनुशीलन ही त्यापेक्षा अधिक गुह्य आहेत आणि परिपूर्ण कृष्णभावनामय भक्तीद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणे हे परम गुह्य ज्ञान आहे. हेच अठराव्या अध्यायाचे सार आहे.

          भगवद्गीतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे गीतेमध्ये परम सत्य म्हणून प्रतिपादन केले आहे. परम सत्याची अनुभूती ही निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या तीन रूपांमध्ये होते. परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान म्हणजेच श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान होय. मनुष्याने जर श्रीकृष्णांचे ज्ञाप प्राप्त केले तर त्याच्यासाठी ज्ञानाचे इतर सर्व विभाग हे आंशिक ज्ञानाप्रमाणेच आहेत. श्रीकृष्ण हे दिव्य आहेत, कारण ते सदैव आपल्या अंतरंगा शक्तीमध्ये स्थित असतात. जीव हे त्यांच्या शक्तीपासून प्रकट होतात आणि त्यांचे वर्गीकरण नित्यबद्ध आणि नित्यमुक्त या दोन वर्गामध्ये करण्यात येते. असे जीव असंख्य आहेत आणि ते श्रीकृष्णांचे अंश आहेत. भौतिक शक्ती ही चोवीस तत्वांमध्ये प्रकट होते. शाश्वत कालतत्त्वामुळे सृष्टी प्रकट होते आणि बहिरंगा शक्तीद्वारे हिची निर्मिती आणि प्रलय होतो. ही प्राकृतिक सृष्टी सतत प्रकट आणि अप्रकट होत असते.

          भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रकृती, जीव, शाश्वत काल आणि कर्म या पाच मुख्य विषयांची चर्चा करण्यात आली आहे. ही सर्व तत्वे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत. परम सत्याच्या सर्व संकल्पना निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि इतर कोणतीही दिव्यत्वाची संकल्पना ही भगवंतांच्या ज्ञानामध्ये अंतर्भूत होते. वरकरणी जरी भगवान, जीव, भौतिक प्रकृती आणि काल हे भिन्न प्रतीत होत असले तरी यांपैकी कोणतेही तत्व परम सत्यापासून अलग नाही. परंतु परम सत्य हे सर्वांपासूनच सदैव भिन्न असते. अचिंत्य भेदाभेद तत्व हे श्री चैतन्य महाप्रभूचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान म्हणजे परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान होय.

          जीवात्मा आपल्या स्वरूपस्थितीत विशुद्ध असतो. तो परमात्म्याच्या एका अणूप्रमाणे असतो. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांची तुलना ही सूर्याशी तर जीवांची तुलना ही सूर्यप्रकाशाबरोबर करता येईल. जीव हे श्रीकृष्णांची तटस्था शक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये बहि:रंग शक्ती अथवा अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येण्याची प्रवृत्ती असते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जीव हे भगवंतांच्या दोन्ही शक्तींच्या मध्ये स्थित आहेत आणि जीव हे पराप्रकृतीस्वरूप असल्यामुळे त्यांना आंशिक स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आदेशांच्या अंतर्गत वास करतो. याप्रमाणे तो अल्हाददायी अंतरंगा शक्तीमध्ये आपली स्वरुपस्थिती प्राप्त करतो.

     या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘मोक्षसंन्यास योग’ या अठराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

bottom of page