top of page

BG 1.1

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १ ॥

धृतराष्ट्र:उवाच - राजा धृतराष्ट्र म्हणाला; धर्म-क्षेत्रे -धर्मक्षेत्रावर; कुरु-क्षेत्रे - कुरुक्षेत्र नावाचा भूमीवर ; समवेता:- एकत्रित आलेल्या; युयुत्सव:- युद्धाची इच्छा करणऱ्या; मामका:- माझा पक्ष (पुत्रांनी); पाण्डवा:-पांडुपुत्र; च- आणि; एव-निश्चितपणे; किम्- काय; अकुर्वत- त्यांनी केले; सञ्जय- हे संजया.

धृतराष्ट्र म्हणाला: हे संजया! कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले?

ताप्तर्य: भगवद्गीता, हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता -माहात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि याप्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्णभक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल, तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे.

     महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या ‘कुरुक्षेत्र’ या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वत: भगवंतांनी  ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते, तेव्हा मानव -समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले.

     येथे धर्म-क्षेत्रे (जेथे धार्मिक कार्ये केली जातात असे ठिकाण) हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धुतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता. आणि त्यामळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की,‘‘त्यांनी काय केले?’’ पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वत:चे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र, कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखीताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये, स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने, युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव, अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकत:च सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली.

     पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते; पण याठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा ‘कुरु’ म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसहक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की, ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत् अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वत: भगवंत करतील. ‘धर्मक्षेत्रे व ‘कुरुक्षेत्रे’ या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे.

bottom of page